देश-विदेशमहाराष्ट्र

सरकारी व कांदळवन जमिनीवरील अनधिकृत बांधकामांना कर आकारणीचा मिरा-भाईंदर महापालिकेचा घोटाळा

मार्च 19 मध्येच उपायुक्तांची बदली झाली असताना डिसेंबर मध्ये त्यांच्या सहीने आदेश काढलाच कसा? उपायुक्तांची स्वाक्षरी बनावट?

भाईंदर, प्ररतिनिधी: सरकारी, कांदळवन, पाणथळ व सीआरझेड १ मधील जमिनीवरील अनधिकृत बांधकामांना कर आकारणी करू नये तसेच सरकारी जमिनी वरील अनधिकृत बांधकामाना शासकीय विभागाची नाहरकत घेऊनच कर आकारणी करावी असा निर्णय महापालिकेने २०१८ मध्ये घेतला परंतु डिसेम्बर २०१९ च्या उपायुक्तांच्या आदेशाचा हवाला देऊन मोठ्या प्रमाणात उपरोक्त क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकामांना कर आकारणी केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्या उपायुक्तांची बदली मार्च २०१९ मध्येच झाली आहे. तब्बल १० महिन्यांनी त्यांच्या सहीने आदेश निघाला कसा? असा प्रश्न आहे. तर स्वतः उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी देखील या आदेशावरील त्या स्वाक्षरी बाबत साशंकता व्यक्त करत बदली झाल्या नंतर इतक्या महिन्यांनी मी कसा आदेश काढू शकतो असा सवाल केला आहे. त्यामुळे पालिकेचा कर आकारणी घोटाळा उघडकीस आला आहे.

मिरा-भाईंदर मध्ये सरकारी जमिनींसह कांदळवन, सीआरझेड १, पाणथळाच्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर भराव करून महापालिकेच्या भ्रष्ट अधिकार्यांच्या संगनमताने बांधकामे करणारे माफिया सक्रिय आहेत. सदर भराव-बांधकामांवर ठोस कारवाई करण्या ऐवजी महापालिका अधिकारी-राजकारणी व स्थानिक नगरसेवकांचे त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. त्यांना संरक्षण देऊन उलट तेथे मालमत्ता कर आकारणी, पाणी व वीज पुरवठा करून अन्य नागरी सुविधा पोहचवल्या जातात जेणेकरून त्या सरकारी जमिनीवर बेकायदा बांधकामे उभारली जातात. त्या मुळे पर्यावरणाचा ऱ्हास तर होतोच शिवाय सरकारी जमिनी बळकावल्या जातात.

ह्या प्रकरणी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त माधव कुसेकर ह्यांनी सुनावणी घेऊन आवश्यक कायदेशीर संदर्भ घेत कांदळवन, पाणथळ व सीआरझेड १ मधील अनधिकृत बांधकामांना कर आकारणी करू नये तसेच सरकारी जमिनी वरील अनधिकृत बांधकामाना शासकीय विभागाची नाहरकत घेऊनच कर आकारणी करावी असा निर्णय आयुक्तांच्या मान्यतेने घेतला होता. त्या अनुषंगाने २७ डिसेम्बर २०१८ रोजी उपायुक्त असलेल्या विजयकुमार म्हसाळ ह्यांनी तसे लेखी आदेश सर्व ६ प्रभाग अधिकारी, कर व नगररचना विभाग ह्यांना कळवले होते. त्या नंतर ५ मार्च २०१९ रोजी म्हसाळ ह्यांची बदली झाली परंतु सदरचा आदेश असून देखील प्रभाग अधिकाऱ्यां कडून मात्र सर्रास अश्या बेकायदा बांधकामांना कर आकारणी केली जात आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कर निरीक्षक, प्रभाग अधिकारी आदींना पाठीशी घातले जात असताना या प्रकरणी १४ डिसेम्बर २०१९ रोजीचा आणखी एक आदेश कर विभागातून समोर आला. सदर आदेशात मात्र शासनाच्या १ जानेवारी २०११ पर्यंतच्या झोपडपट्ट्या संरक्षित असल्याचा हवाला देऊन अश्या बांधकामांचा पुरावा तपासून कर आकारणी करण्यास मोकळीक देण्यात आली परंतु १४ डिसेंबर २०१९ च्या आदेशावर म्हसाळ ह्यांची स्वाक्षरी केलेली असून प्रत्यक्षात मात्र मार्च २०१९ मध्येच जर त्यांची बदली झाली असताना त्या नंतर तब्बल १० महिन्यांनी त्यांची सही आली कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर आदेशावरील छापील वर्षाच्या ८ आकड्यात देखील बदल करून तो पेनाने ९ करण्यात आला असून सदर आदेशाचे पत्र बोगस असल्याची शक्यता वर्तविली जात असून या घोटाळ्याची उच्च स्तरावर चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

सध्या ठाणे महापालिकेत कार्यरत असलेल्या म्हसाळ ह्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील सदर आदेशातील स्वाक्षरी आपली वाटत नाही असे सांगितले. मार्च मध्येच आपली बदली झाली असताना डिसेम्बर महिन्याच्या आदेशावर आपण स्वाक्षरी कशी करू शकतो? असे ते म्हणले यावरून सदर आदेश बोगस असल्याचे स्पष्ट होत आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेतील कर विभागाचा अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचार हा काही नवीन नसून कर आकारणीचे घोटाळे सुद्धा अनेक आहेत. त्यातच अनधिकृत बांधकामे व झोपडपट्टयां भागातील अनधिकृत बांधकामांना कर आकारणीसाठी लाखो रुपये घेऊन कर आकारणी केली जात असून काही दलाल सुद्धा या कर आकारणीच्या कामात सक्रिय असल्याचे आरोप केले जात आहेत.

त्यामुळे खोट्या सही वा तारखेचा बनावट आदेश काढून मोठ्या प्रमाणात कांदळवन, पाणथळ, सीआरझेड-१ तसेच सरकारी जमिनी वरील अनधिकृत बांधकामाना कर आकारणी करण्यात आली आहे असे हाती लागलेल्या कागदपत्रांवरून दिसून येत आहे. कर आकारणीसाठी जोडलेले पुरावे देखील अपुरे व बोगस असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या कर विभागातिल अधिकार्यांच्या संगनमताने होत असलेल्या या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

Share
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close