कोरोनाचा प्रसार व प्रभाव रोखण्यासाठी राज्य शासनाची “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही विशेष मोहिम
मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणी व व्यापक प्रसिध्दीकरिता शासनाने जाहीर केली बक्षीस योजना!

जिल्हा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात कोविड-19 आजाराचा प्रसार आणि प्रभाव कमी करण्याकरिता राज्य शासना तर्फे अनेक
उपाययोजना तसेच राज्यात व मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात जनजागृती व घरोघरी सर्वेक्षणासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही विशेष मोहिम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशा नुसार १५/१०/२०२० ते २५/१०/२०२० या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणी व व्यापक प्रसिध्दीकरिता जनतेचा सहभाग आवश्यक आहे. याकरिता विद्यार्थी, पालक, सामान्य व्यक्ती यांचेसाठी शासनामार्फत “बक्षिस योजना” लागू करण्यात आली आहे. बक्षिस योजनेमध्ये निबंध, पोस्टर्स, मेसेजेस, शॉर्ट फिल्मस इत्यादी उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे. प्राप्त झालेले निबंध, पोस्टर्स, मेसेजेस, शॉर्ट फिल्मस या अनुभवी प्रशिक्षकांकडून तपासल्या जातील. बक्षिस मिळालेला निबंध, पोस्टर्स, मेसेजेस, शॉर्ट फिल्मस इत्यादींना राज्य शासनातर्फे प्रसिध्दी देण्यात येईल. तसेच खालील तक्त्यात नमूद प्रमाणे विजेत्याला बक्षिस व ढाल प्रदान केले जाईल. राज्य शासनाने जी बक्षीस योजना जाहीर केली आहे त्यानुसार राज्यस्तरीय पहिले बक्षीस १००००, दुसरे बक्षीस ५००० आणि तिसरे बक्षीस ३००० रुपये असणार आहे. जिल्हास्तरीय पहिले बक्षीस ५०००, दुसरे बक्षीस ३००० आणि तिसरे बक्षीस २००० रुपये, महापालिका स्तरावरील पहिले बक्षीस ५०००, दुसरे बक्षीस ३००० आणि तिसरे बक्षीस २००० रुपये तर आमदार संघ स्तररावर पाहिले बक्षीस ३०००, दुसरे बक्षीस २००० आणि तिसरे बक्षीस १००० रुपये अशा स्वरूपाची बक्षीस योजना जाहीर करण्यात आलेली आहे.
सद्यस्थितीत राज्यशासनाच्या निर्देशानुसार सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणपध्दती कार्यान्वित करण्यात आली आहे. माझे कुटुंब व माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत नोडल अधिकारी म्हणून शिक्षण विभाग, समग्र शिक्षणाच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्रीम. जयश्री भाईर यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने मिरा भाईंदर शहरातील महानगरपालिका शाळा व अनुदानित / विनाअनुदानित खाजगी शाळा यांनी या मोहिमेबद्दल अधिक माहितीसाठी नोडल अधिकारी यांच्याशी ९००४०८३८०१ या क्रमांकावर व ssambmc07@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा. या मोहिमेत सर्व विद्यार्थी, पालकवर्ग यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होणे करिता शाळेच्या सर्व शिक्षक / शिक्षिकांनी सहभागी होऊन ऑनलाईन अध्यापन करताना मार्गदर्शन करावे. तरी मिरा भाईंदर शहरातील सर्व विद्यार्थी, पालकवर्ग, शिक्षक वर्ग यांनी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेत जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.