परिमंडळ -1 चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी घेतली पत्रकारांची अनौपचारिक भेट
पत्रकार आणि पोलीस प्रशासनामध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने पोलिसांची एक सकारात्मक सुरुवात

भाईंदर, प्रतिनिधी: मीरा भाईंदर शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनावर पडणारा वाढता तणाव पाहता मिरा भाईंदर शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय व्हावे अशी मागणी कित्येक वर्षांपासून केली जात होती. या मागणीचा पाठपुरावा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक सह माजी आमदार नरेंद्र मेहता, माजी महापौर व विद्यमान आमदार गीता जैन सह अनेक लोकप्रतिनिधीनी लावून धरला होता. अखेर त्या मागणीला मान्यता देऊन महाराष्ट्र शासनाने मिरा भाईंदर शहर आणि वसई-विरार शहरासाठी पोलीस आयुक्तालयाची स्थापना 01 ऑक्टोबर पासून करण्यात आली आहे. महानगर पालिकेच्या मिरारोड येथील रामनगर प्रभाग कार्यालयात पोलीस आयुक्तालय बनविण्यात आले असून या अंतर्गत मिरा भाईंदर शहरातील सहा पोलीस ठाण्याचा समावेश करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालय झाल्या नंतर पहिल्यांदाच आयुक्तालय परिमंडळ-1 चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी आज शहरातील सर्व पत्रकारां सोबत एक अनौपचारिक बैठक घेतली. या बैठकीला सहआयुक्त विलास सानप, शशिकांत भोसले, भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव आणि शहरातील सर्व प्रमुख पत्रकार उपस्थित होते.
या बैठकीत सर्व प्रथम पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सर्व पत्रकारांची ओळख करून घेतली आणि त्यांच्या काही सूचना, माहीती आणि शहराशी संबंधित समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कोण कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांच्या समन्वयाने शहरातील गुन्हेगारी कशी कमी करता येईल यावर चर्चा करण्यात आली. पत्रकार आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये नेहमीच एक दुरावा असतो, एकमेकांत योग्य सूचनांचे आदान प्रदान होत नाही त्याकरिता पोलीस आयुक्तालयात एक उन्नत प्रकारची जनसंपर्क प्रणाली उदा. ट्विटर, फेसबुक, व्हाट्सएप, वेबसाईट आणि इतर समाज माध्यम सारखे माध्यम विकसित करण्यात येईल जेणेकरून शहरातील सर्व पत्रकारांना पोलिसांच्या कामकाजाची माहिती सहजपणे उपलब्ध होऊ शकेल असे आश्वासन यावेळी उपायुक्त अमित काळे यांनी दिले. त्याच प्रमाणे शहरात अनेक नागरी समस्या आहेत, शहरात ड्रग्ज माफियांनी हैदोस मांडलेला आहे त्यावर नियंत्रण कसे आणता येईल? अनेक भूमाफियावर अनेक वेळा MRTP अंतर्गत कारवाई करून देखिल शहरात अनधिकृत बांधकामे केली जात आहेत त्यांचेवर तडीपारी सारखी प्रतिबंधात्मक कारवाई करणे, शहरात ट्रॅफिची समस्या देखील गंभीर झाली आहे अशा अनेक विषयांवर मोकळेपणाने चर्चा करण्यात आली. या सर्व विषयांवर लवकरच योग्य ते निर्णय घेण्यात येतील त्यासाठी पत्रकारांनी देखिल पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले.
मिरा भाईंदर शहरात पोलीस आयुक्तालयाची स्थापना होणे ही शहराच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक होते त्यामुळे अनेक सामाजिक समस्यावर तोडगा काढण्यास मदत होणार आहे आणि त्या करिता पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांनी एकमेकांच्या सहकार्याने कार्य करण्याची गरज असून आज घेण्यात आलेली अनौपचारिक बैठक ही त्याच दिशेने टाकण्यात आलेले एक स्वागतार्ह असे पाहिले पाऊल आहे. पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी एक सकारात्मक सुरुवात केली असून पत्रकारांनी देखिल याबाबत समाधान व्यक्त केले आहे.