महाराष्ट्रमुंबई

अनधिकृत बांधकाम तोडल्यामुळे भाजपचे नगरसेवक दुखावले? प्रभाग अधिकारी आणि कनिष्ठ अभियंत्याच्या निलंबनाची केली मागणी

सत्तेचा व पदाचा वापर करून अनधिकृत बांधकामांना संरक्षण देऊन केली जात आहे वसुली?

भाईंदर प्रतिनिधी: भाईंदर पश्चिमेकडील राई, मोर्वा, मुर्धा, उत्तन आणि पाली परिसरात ना-विकास क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात शहरातील अनेक पत्रकार आणि समाजसेवकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत त्यापैकी काही तक्रारींची दखल घेऊन काही अनधिकृत बांधकामे महापालिकेच्या अतिक्रमण विभाग आणि प्रभाग अधिकारी यांनी तोडल्यामुळे या अनधिकृत बांधकाम धारकांशी हितसंबंध असलेले भाजपचे नगरसेवक, नगरसेविका यांचे भू-माफियांशी असलेले हितसंबंध दुखावले असून आपल्या सत्तेचा आणि पदाचा वापर करून थेट प्रभाग अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता यांच्या निलंबनाची मागणी उपायुक्त मुख्यालय यांचेकडे केल्यामुळे महापालिका कर्मचारी वर्गात नाराजी पसरली आहे.
मिरा भाईंदर शहरात मोठया प्रमाणात होणारी अनधिकृत बांधकामे हा एक नेहमीच कळीचा मुद्दा राहिलेला आहे. अनधिकृत बांधकाम करणारे भू-माफिया, महापालिका अधिकारी आणि शहरातील राजकारणी यांचे साटेलोटे असल्यामुळेच शहरात राजरोसपणे अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. या अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यासाठी लाच घेताना अनेक प्रभाग अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनेकवेळा रंगे हात अटक देखील केली आहे तर काही नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी देखिल करण्यात आलेली आहे. परंतु सत्तेचा दुरुपयोग करून आणि कायद्यातील पळवाटा काढून हेच प्रभाग अधिकारी आणि नगरसेवक उथळ मानेने पुन्हा अशाच प्रकारे अनधिकृत बांधकामांना सरंक्षण देण्याचे कार्य करीत आहेत.
कोरोना काळात लागू असलेल्या लोकडाऊनचा फायदा घेऊन गेल्या काही महिन्यांत भाईंदर पश्चिमेकडील प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 01 च्या उत्तन, पाली, राई,मोर्वा, मुर्धा परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे केली गेली आहेत. या अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यासाठी भाजपच्या काही नगरसेवकांनी आपला प्रभाव वापरला असून भू-माफिया आणि या नगरसेवाकांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गेल्या काही दिवसात प्रभाग समिती कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात काही अनधिकृत बांधकामांवर महापालिका प्रशासनाने तोडक केली आहे त्यामुळेच नगरसेवक आणि अनधिकृत बांधकाम करणारे भू-माफिया यांचे आर्थिक हितसंबंध दुखावले गेल्यामुळे याचाच राग मनात ठेऊन भाजपच्या नगरसेवकांनी थेट महापालिका उपायुक्त मुख्यालय यांचेकडे प्रभाग अधिकारी आणि कनिष्ट अभियंता यांच्या निलंबनाची मागणी केली असून उपायुक्तांनी तसा अहवाल महापालिका आयुक्तांना सादर केला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.
एकीकडे शहरात अनधिकृत बांधकामे होत असल्याच्या नावाने बोंबा मारायच्या तर दुसरीकडे याच अनधिकृत बांधकामाना संरक्षण देण्यासाठी महापालिका प्रशासनावर दबाव आणायचा अशी दुटप्पी भूमिका भाजपचे नगरसेवक घेत असल्यामुळे महापालिका कर्मचारी वर्गात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आता महापालिका आयुक्त यावर काय निर्णय घेतात? अनधिकृत बांधकामे तोडणारे प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांची पाठराखण करतात की सत्ताधारी भाजपच्या दबावाला बळी पडून त्यांच्या निलंबनाच्या आदेशावर शिक्कामोर्तब करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. परंतु या प्रकरणामुळे मिरा भाईंदर शहरात अनधिकृत बांधकाम करणारे भू-माफिया आणि लोकप्रतिनिधी यांचे हितसंबंध किती घट्ट आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close