मुंबई

मीरा भाईंदर शहरातील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर! नरेंद्र मेहता विरोधक नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्षांना दिले निवेदन

भाईंदर, प्रतिनिधी: मीरा भाईंदर शहरातील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात भाजपातील अनेक नगरसेवकांसह जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी भाईंदरच्या उत्तन येथील केशव सृष्टीमध्ये अनौपचारिक भेटीस आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या समोर नरेंद्र मेहता विरोधात तक्रारींचा पाढाच वाचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मिरा भाईंदर शहरातील भाजपातील अंतर्गत वाद धुमसत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले असून पक्षाची गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

मीरा भाईंदर पालिकेतील सत्ताधारी भाजपातील सुमारे निम्मे नगरसेवक माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या एकूणच कार्य पद्धतीवर नाराज आहेत. गेल्या काही वर्षांत नरेंद्र मेहता यांचेवर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत त्यामुळे त्यांची डागाळलेली वादग्रस्त प्रतिमा आणि त्यांचा पक्षातील अनावश्यक, गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप त्याच बरोबर महानगरपालिकेत त्यांची एकाधिकाशाही यामुळे त्रस्त झालेले त्यांचे विरोधात पक्षाचे नगरसेवक व काही वरीष्ठ पदाधिकारी एकवटले आहेत. तर गेल्या वर्षी त्यांनी स्वतःच सक्रीय राजकारणातुन सन्यास घेत असल्याची घोषणा करून देखील नरेंद्र मेहता महापालिका आणि पक्षाच्या स्थानिक कारभारात अनावश्यक ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप केला जात आहे.

या सर्व प्रकाराला कंटाळून पक्षातील अनेक नगरसेवकांनी मेहतां विरुद्ध उघड भूमिका घेण्यास सुरुवात केली मिरा भाईंदर शहरात भाजप पक्षाचे समर्थक A ग्रुप तर नरेंद्र मेहता यांचे व्यक्तीगत समर्थक यांचा B ग्रुप असे दोन गट तयार झाले आहेत. त्याच अनुषंगाने उत्तन येथील केशवसृष्टी येथे आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची नाराज नागरेसेवकांनी भेट घेऊन नरेंद्र मेहतां विरोधात लेखी तक्रार वजा निवेदन देऊन आपल्या तक्रारींचा पाढाच वाचला आहे. त्यावेळी भाजपाचे प्रदेश सचिव श्रीकांत भारतीय सुद्धा उपस्थित होते. भाजपातील अनेक ज्येष्ठ व प्रमुख नगरसेवकांसह खुद्द जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे आदींनी वरिष्ठांकडे आपली भूमिका स्पष्ट केली असून नरेंद्र मेहतांमुळे पक्षाच्या प्रतिमेला नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी उपस्थित नगरसेवकांनी नरेंद्र मेहतांमुळे पक्षाची होत असलेली बदनामी आणि विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव तसेच येणाऱ्या २०२२ च्या पालिका निवडणुकीत मेहतांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढणे शक्य नसल्याचे मुद्दे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या समोर मांडले. शिवसेने कडून पक्ष प्रवेश करण्यासाठी आम्हाला ऑफर आल्या आहेत परंतु आम्ही पक्षाचे निष्ठावंत म्हणून कुठे जाणार नाही पण मेहता यांच्या नेतृत्वाखाली काम करणे आम्हाला शक्य होणार नसून याबाबत पक्षश्रेष्ठींनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा पक्षाला मोठे नुकसान होईल असे मत उपस्थित नगरसेवकांनी मांडल्याचे सूत्रांनी सांगितले .

नरेंद्र मेहतांनी यांनी भाजप पक्षाच्याच्या नावाचा वापर करून स्वतःचा आणि आपल्या कंपनीचा भरपूर फायदा करून घेतला आहे. शिवाय पालिका आणि पक्षात मनमानीपणाने कारभार चालवला आहे त्यामुळे आता पक्षात उघड उघड दोन गट तयार झाले आहेत पक्षाची ही फूट थांबवायची असेल तर त्यावर तात्काळ निर्णय घ्यावा लागेल परंतु जर हाताला झालेली जखम आधी बरी होते का ते पाहू आणि जर जखम बारी होत नसेल तर हात कापावाच लागतो असे उदाहरण देऊन या विषयावर पक्षश्रेष्ठीशी चर्चा करून लवकरच काही निर्णय घेऊ असे आश्वासन देऊन तूर्तास नाराज नगरसेवकांची समजूत काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या प्रकरणात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी माजी उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी समितीचे माजी सभापती रवी व्यास, सुरेश खंडेलवाल आदींकडे प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील अनौपचारिक कार्यक्रमासाठी केशवसृष्टी येथे आले होते त्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यावेळी शहराचा विकास, पक्ष व पालिका इत्यादी विषयांवर चर्चा झाली असे सांगून या लोकांनी पक्षातील नाराजी बाबत बोलणे टाळले. परंतु ह्या सर्व घडामोडींवर बारकाईने पाहिले असता मिरा भाईंदर शहरातील भारतीय जनता पक्षात सर्वकाही आलबेल आहे असे दिसत नाही.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close