टॉप न्यूज़

मीरा-भाईंदर शहरातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा गेला 738 च्या पार! तर 31 मे या एकाच दिवशी 89 रुग्णांची विक्रमी नोंद तर 05 जणांचा मृत्यू!

Jun 1 2020 1:05PM

भाईंदर (प्रतिनिधी): मिरा भाईंदर शहरात रविवारी 31 मे रोजी या एकाच दिवशी मिळून आलेल्या 89 नवीन कोरोनाच्या रुग्णांची विक्रमी संख्या आणि मृत्यूचा आकडा 05  ही बातमी शहरातील नागरिकांची चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिनांक 31 मे रोजी हाती आलेल्या वृत्तानुसार कोरोनाच्या 89 नविन रुग्णांची नोंद ही आता पर्यंत मिळून आलेल्या रुग्णांच्या आकडेवारी पेक्षा सर्वात जास्त आहेत त्यामुळे मिरा भाईंदर शहरात कोरोनाचा ज्वालामुखीचा उद्रेक होतो की काय? अशी शंका नागरिकांत व्यक्त केली जात आहे. 

शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असून या परिस्थितीला जबाबदार कोण? प्रशासनाचा ढिसाळपणा कारणीभूत आहे का? किंवा नागरिकांच्या बेशिस्तपणामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे? याबद्दल उलटसुलट चर्चा आता शहरात केली जात आहे. 

 

संपूर्ण देशामध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गेल्या दोन ते अडीच महिने लागोपाठ संपूर्ण लॉकडाउन करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत अनेक कामगार, मजूर, विद्यार्थी, पर्यटक जिथे आहेत तिथेच अडकून पडले असताना अनेक परप्रांतीय मजुरांनी गावी जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या पैकी हजारो मजुरांनी पायी चालत जाण्याचा मार्ग निवडला तर काही लोकांनी प्रशासनाच्या मदतीने गावी जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले या सर्व प्रकरणामुळे हजारो मजुरांची अक्षरशः हेळसांड झाली आहे. त्यातच प्रवासासाठी ई-पास बनविण्यासाठी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी लोकांची झूंबड उडाल्याचे चित्र देखील शहरातील अनेक ठिकाणी पहायला मिळाले. त्यामुळे सोशल डिस्टेंसीगचा अक्षरशः फज्जाच उडाला होता. त्याच प्रमाणे शहरात अनेक ठिकाणी लाॅकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून नागरिकांनी रोजच्या जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी केली जात होती तरी देखील प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पहायला मिळाले. या सर्व परिस्थितीमुळेच आता शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे असा आरोप केला जात आहे. 

 

मीरा-भाईंदर शहरातील कोरोनाच्या एकुण रुग्णांचा आकडा आता 738 च्या पार गेलेला आहे तर आतापर्यंत एकूण 424 रूग्ण बरे देखील झाले आहेत. शहरात आतापर्यंत एकूण 29 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असून 2883 रूग्णांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल येण्याची वाट पाहिली जात आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लाॅकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असताना "अत्यावश्यक सेवा" अशा प्रकारचे स्टीकर लावून शहरात बिन बोभाटपणे फिरणारी मोकाट वाहने, रोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी उडालेली अनावश्यक झूंबड, काशिमीरा, रामदेव पार्क, गोविंद नगर, शितल नगर, भाईंदर पूर्वेकडील नवघर गाव, पश्चिमेकडील राई-मुर्धा मोर्वा परिसरात गुटखा-दारूची चोरटी विक्री, भाईंदर पूर्वेकडील गणेश देवल नगर, जयअंबे नगर, शिवसेना गल्ली परिसरात परप्रांतीय मजुरांनी गावी जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेली गर्दी आणि या सर्वांना आटोक्यात ठेवण्यासाठी प्रशासनाचा ढिसाळपणा कारणीभूत ठरला असून त्यामुळेच शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे असा आरोप आता केला जात असून यापुढे जर कोरोनाचा प्रसार थांबवायचा असेल तर लाॅकडाऊनच्या नियमांचे कठोर अमलबजावणी करण्यासाठी ठोस आणि कठोर कारवाई झाली पाहिजे अशी अपेक्षा नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे. 

प्रतिक्रिया

View all CommentsMake it modern

Popular Posts